बेजबाबदार महापालिका
जालना (डॉ आशिष तिवारी)
जालना महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानादरम्यान कालिकुर्ती परिसरातील कचरा आणि घाण याच भागातील 95 वर्षीय ज्येष्ठ नागरिक बालकिशन शर्मा यांच्या खाजगी प्लॉटवर आणून टाकून या प्लॉटला डम्पिंग ग्राउंड बनवण्यात आले. हा कचरा उचलण्याबाबत महापालिकेकडे निवेदन देण्यात आले असता, खाजगी प्लॉटवरील कचरा उचलण्याची जबाबदारी महापालिकेची नाही, असे बेजाबाबदारपणाचे उत्तर देणाऱ्या उपायुक्तांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी ॲड. महेश धन्नावत यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे 24 ऑगस्ट रोजी केली आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात ॲड. धन्नावत यांनी म्हटले आहे की, मध्यंतरी महापालिकेच्यावतीने शहरात प्रत्येक प्रभागात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. कालीकुर्ती परीसरात अभियान राबविताना उचलण्यात आलेला कचरा आणि घाण जेष्ठ नागरीक बालकिशन शर्मा घरासमोर असलेला खाजगी मोकळ्या प्लॉटवर टाकण्यात आल्याने या प्लॉटला डंपिंगग्राऊडचे स्वरूप आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सर्वत्र हरघर तिरंगा अभियान राबविण्यात आले. मात्र, घरासमोरच डम्पिंग ग्राउंड असल्याने, राष्ट्रध्वज लावणे हा तिरंग्याचा अवमान ठरू नये म्हणून कालीकुर्ती भागातील अनेक नागरिकांना हर घर तिरंगा या अभियानात सहभाग नोंदविता आला नाही. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाद मागितली तसेच याबाबत अनेक वृत्तपत्रात बातम्याही प्रकाशित झाल्या. महास्वच्छता अभियानातील कचरा महापालिकेने खाजगी प्लॉटवर टाकलेला असल्याने तो महापालिकेने उचलणे अभिप्रेत होते. मात्र, खाजगी प्लॉटवरील कचरा उचलण्याचे काम महापालिकेने करणे अपेक्षित नसताना तुम्ही तसेच सांगत आहात. तरी देखील आम्ही महापालिकेचा सफाई कर्मचाऱ्यांमार्फत कचरा उचलला आहे, असे बेजबाबदारपणाचे उत्तर महापालिका उपायुक्तांनी 22 ऑगस्ट रोजी एका पत्राद्वारे दिले. प्रत्यक्षात फक्त थोडाच कचरा उचलण्यात येऊन उर्वरित कचरा तेथेच ठेवण्यात आलेला आहे, असे निवेदनात नमूद ॲड. धन्नावत यांनी म्हटले आहे की, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने अनेक न्यायनिवाडामध्ये डम्पिंग ग्राउंड ग्राउंड हे खाजगी प्लॉटवर असेल व त्यांचा त्रास इतरांना होत असेल तर ते हटविणेसुध्दा महानगर पालिकेचीच जबाबदारी आहे. लोकांना त्रास होऊ नये याची काळजी घेणे ही महानगर पालीकेची जबाबदारी बनते, असे स्पष्ट नमूद असताना महानगर पालीका डम्पिंग ग्राउंडवरील कचरा हटविण्याबाबत कोणतीही कार्यवाही करणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या बेजबाबदार उपायुक्तांना तात्काळ निलंबित करून, डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीतून जेष्ठ नागरीकाचा जीव वाचवावा, अशी मागणी ॲड. धन्नावत यांनी केली आहे.
