मेहकर(उध्दव फंगाळ)
मेकर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदारांनी मेहकर येथील क्रीडा संकुलासाठी एक कोटी रुपये आणल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे, ते निखालस खोटे असून माझ्या कार्यकाळात मेहकर व लोणार तालुका क्रीडा संकुलासाठी प्रत्येकी चार चार कोटी रुपये मी मंजूर करून आणली असून त्यापैकी मेहकर येथे सव्वा कोटी ची कामे याआधीच पूर्ण होत आली आहेत , असा दावा माजी आमदार संजय रायमुलकर यांनी केला आहे.
आमदार सिद्धार्थ खरात यांनी क्रीडा मंत्री यांचे पत्र प्रसिद्धीला देऊन एक कोटी मंजूर करून आणल्याचे भासवले आहे.त्या पत्रातच संदर्भिय पत्र क्रमांक व दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ दिलेला आहे.मी स्वतः क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांचेकडून माझे कार्यकाळात सदर तारखेच्या शासन निर्णय क्रमांक ३४२४ दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ अन्वये मेहकर तालुका क्रीडा संकुलासाठी चार कोटी रुपये आणि लोणार तालुका क्रीडा संकुलासाठी चार कोटी रुपये मंजूर करून आणले होते, असे स्पष्टीकरण देऊन संजय रायमुलकर यांनी सांगितले की, त्यामुळे या कामांचे श्रेय आमदार खरात यांनी घेऊ नये व चुकीची प्रसिद्धी करून घेऊ नये.
महायुती सरकारच्या कार्यकाळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ४ कोटींपेक्षा जास्त रकमेची विकास कामे मेहकर, लोणार तालुक्यात मी स्वतः मंजूर करून आणली आहेत , असे सांगून माजी आमदार संजय रायमुलकर यांनी पुढे सांगितले की, विद्यमान आमदारांनी सद्यस्थितीत एकही काम मंजूर करून आणलेले नसताना आम्ही मंजूर केलेल्या कामांचीच भूमिपूजने करून जबरदस्ती श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
मेहकर तालुका क्रीडा संकुलातील ८० लाख रुपये खर्चाच्या संरक्षण भिंत बांधकामाचे आणि ४० लाख रुपये खर्चाच्या बॅडमिंटन हॉल दुरुस्तीच्या कामाचे भूमिपूजन मी स्वतः २३ डिसेंबर २०२४ रोजी केलेले आहे. मी मंजूर करून आणलेल्या कामांपैकी अजूनही खेळाडूंसाठी विशेष धावपट्टी तयार करणे, क्रीडा संकुलाचे सौंदर्यीकरण करणे ,प्रेक्षक गॅलरीचे बांधकाम करणे, मैदानाचे सपाटीकरण करणे अशी कोट्यावधी रुपयांची कामे अद्यापही बाकी आहेत , असे संजय रायमुलकर यांनी सांगितले. मी मंजूर करून आणलेल्या निधीतूनच लोणार येथेही संरक्षण कुंपण, बॅडमिंटन हॉल आदी कामे प्रगतीत आहेत ,असेही त्यांनी सांगितले. दोन्हीही ठिकाणी यापूर्वीच मंजूर करून आणलेल्या प्रत्येकी चार चार कोटी रुपयांच्या निधीतूनच सर्व कामे होणार आहेत ,असेही ते म्हणाले.
*****************
