मेहकर (उध्दव फंगाळ)
लोणार महोत्सवाचे आयोजन करणे आणि लोणार विकास आराखड्यातील कामांना गती देण्याची मागणी माजी आमदार संजय रायमुलकर यांनी पर्यटन मंत्र्यांकडे केली होती .लोणार येथे दुर्गा टेकडी परिसरात रिसॉर्ट मध्ये अतिरिक्त सूट बांधकाम आणि पायाभूत सुविधा निर्मितीसाठी ९ कोटी ८२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
लोणार पर्यटन महोत्सवाचे आयोजन आणि लोणार आराखड्यातील विकास कामांना गती देण्याच्या मागणीसाठी माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या मागणीनुसार १० फेब्रुवारी २०२५ रोजी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पर्यटन महोत्सव आयोजित केला जाईल आणि लोणार विकास आराखड्यातील कामांना गती देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल, असे आश्वासन नामदार देसाई यांनी दिले होते. संजय रायमुलकर यांच्याच प्रयत्नातून ४३४ कोटी ६२ लाख रुपयांचा लोणार विकास आराखडा तयार करण्यात आला होता.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार लोणार येथे दुर्गा टेकडी परिसरात रिसॉर्ट मध्ये अतिरिक्त सूट चे बांधकाम करणे यासाठी चार कोटी ९२ लाख आणि याच ठिकाणी पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने पायाभूत सुविधा निर्मितीसाठी चार कोटी ९० लाख असे ९ कोटी ८२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. खात्याचे उपसचिव संतोष विठ्ठल रोपे यांच्या स्वाक्षरीने सदर परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून ही कामे होणार असून आराखड्यातील इतरही कामांसाठी महायुती सरकारकडून आवश्यक तो निधी आणला जाईल, अशी माहिती संजय रायमुलकर यांनी दिली.
****************”*****