साखरखेर्डा ( गजानन बोरकर)
येथील समाधान किसन गवई यांच्या शेतात एका प्रेमीयुगुलांनी काल २२ डिसेंबर रोजी आत्महत्या केल्यानंतर आज सकाळी साखरखेर्डा येथेच गोपालचे वडील समाधान खिल्लारे यांनी सासऱ्याच्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे . तर २३ डिसेंबर रोजी मतक साक्षी अंभोरे हिच्यावर शेंदुर्जन येथे तर गोपाल आणि त्यांचे वडील समाधान खिल्लारे यांच्यावर साखरखेर्डा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले .
साखरखेर्डा येथील समाधान किसन गवई यांचे समाधान खिल्लारे हे जावई होते . तर गोपाल हा नातू होता . मृतक गोपाल आणि मृतक साक्षी हे १८ ला शेंदुर्जन येथून फरार झाले होते . त्यानंतर त्यांनी इतर ठिकाणी आश्रय घेतल्यानंतर २० ला आर्थीक चनचन भासत असल्याने त्यांनी आजोबा समाधान गवई यांचे कडे राहू लागले . त्यातच मुलीच्या आईने गोपाल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती . त्यावरुन साखरखेर्डा पोलीसांनी समाधान खिल्लारे यांना मुलांच्या शोधार्थ ताब्यात घेतले होते . दोघांनी पोलीस स्टेशनमध्ये हजर करतो येवढं संभाषण झाल्यानंतर समाधान खिल्लारे हे सासऱ्याकडे आले . दोघांना जेवण झाल्यानंतर पोलिस स्टेशन मध्ये दाखल करण्यात येणार असल्याची कुणकुण लागली .
घरातील आजोबा , आजी , आई , वडील रक्षाविसर्जन कार्यक्रमासाठी गेले असता ती संधी साधुन दोघेही पोलीस स्टेशन समोरुन सुत गिरणी वरुन सकाळी थेट गुंज माथा रस्त्याने हाडोळा आणि कंचनिचा माळ या टेकडीवरील आजोबा समाधान गवई यांचे शेतात गेले . त्याठिकाणी दुपारी दोन वाजता गळफास लावून आत्महत्या केली . काल ही घटना घडत नाही तोच मुलांवर अंतिम संस्कार करण्यापूर्वी पित्याने ( समाधान खिल्लारे ) यांनी बांधकाम सुरू असलेल्या एका घराच्या चौकटीला दोरफास लावून लटकलेल्या अवस्थेत आढळून आले .
त्यांनी आत्महत्या केल्याची वार्ता वाऱ्यासारखी साखरखेर्डा आणि परिसरात पसरली . साखरखेर्डा येथील स्मशानभूमीत दुपारी पाच वाजता गोपाल आणि समाधान यांना एकाच चितेवर भडाग्नी देण्यात आला . तर मुलीवर शेंदुर्जन येथे तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले .
—————————————————————–
समाधान खिल्लारे आणि गोपाल यांचा अंत्यसंस्कार शेंदुर्जन येथे करावेत , आपण एकाच समाजातील असल्याने कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही . परंतू नातेवाईक मंडळींनी त्यांचे मृतदेह साखरखेर्डा येथे नेऊन अंत्यसंस्कार केले .
अनिल गवई , माजी सरपंच
साखरखेर्डा
—————————————————————–
समाजात सामंजस्य राहावे , कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून समाधान खिल्लारे व गोपाल यांच्यावर साखरखेर्डा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले .
कमलाकर गवई
माजी सरपंच , साखरखेर्डा