शेवगाव (जयप्रकाश बागडे)
शेवगाव तालुक्याच्या दादेगाव येथील राम श्रीधर देवढे यांनी 18 डिसेंबर रोजी त्यांचे टेम्पोमध्ये कापुस भरुन शेवगांव येथील वजनकाट्यावर वजन करण्यासाठी गेले असता त्यांचेकडे असलेली पैशाची बॅग गाडीमध्ये ठेवुन वजनकाटा केबिनमध्ये गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने गाडीमधील 1,75,000/- रुपये असलेली पैशाची बॅग चोरुन नेली होती. सदर या घटनेबाबत शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं. 1148/2023 भादवि कलम 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटना घडल्यानंतर राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्हा उघडकीस आणणे करीता विशेष पथक नेमुण कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/1372 संतोष लोढे, पोना/रविंद्र कर्डीले, फुरकान शेख, संतोष खैरे, पोकॉ/शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाठ अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेणे बाबत मार्गदर्शन करुन पथकास तात्काळ रवाना केले.
वरील पथक दिनांक 20/12/2023 रोजी शेवगांव परिसरामध्ये गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढत असतांना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वर नमुद गुन्हा हा प्रशांत ससाणे रा. शेवगांव व त्याचे इतर साथीदारांनी केला असुन तो नित्यसेवा हॉस्पीटल चौक, शेवगांव या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाल्याने प्राप्त माहिती पथकास देवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत कळविले.
पथकाने लागलीच नित्यसेवा चौक, शेवगांव या ठिकाणी जावुन सापळा रचुन थांबले असता नित्ससेवा चौक येथे एक इसम संशयीत रित्या दिसुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) प्रशांत संजय ससाणे वय 33 वर्षे, रा. सिध्दार्थनगर, अहमदनगर, हल्ली रा. रामनगर, शेवगांव, ता. शेवगांव असे असल्याचे सांगितले.
त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवुन गुन्ह्यातील चोरी गेलेमालापैकी 50,000/- रुपये रोख रक्कम काढुन दिलेली आहे. सदर आरोपीस ताब्यात घेवुन पुढील तपासकामी शेवगांव पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे. आरोपी प्रशांत संजय ससाणे हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेविरुध्द अहमदनगर जिल्ह्यामध्ये चोरी, विनयभंग अशा प्रकारचे एकुण 04 गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व सुनिल पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.