संत नामदेवांच्या सोळाव्या वंशजांची ज्ञानमंदिराला भेट

मेहकर (उध्दव फंगाळ) तेराव्या शतकात पूर्ण भारतभर फिरुन वारकरी भक्तीधारेचा विस्तार करणारे संत नामदेव महाराज यांचे सोळावे वंशज प.पू.केशव महाराज नामदास यांनी २५ डिसेंबर रोजी मेहकरच्या श्रीक्षेत्र ज्ञानमंदिर व नरसिंह संस्थानला सपत्नीक भेट दिली. संस्थानच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

श्रीक्षेत्र ज्ञानमंदिर मठात पीठाधीश सद्गुरु ॲड.रंगनाथ महाराज पितळे यांच्या उपस्थितीत सनदी लेखापाल वासुदेव उमाळकर (नागपूर) यांच्याहस्ते नामदास महाराजांचा सत्कार करण्यात आला. तर डॉ.शिवालीताई उमाळकर यांच्या हस्ते सौ.आईसाहेब नामदास यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराजांनी संस्थानमधील नरसिंह मंदिर, संत बाळाभाऊ महाराज जन्मस्थळ, ऐतिहासिक यज्ञभूमी, ज्ञानमंदिर पादुकास्थळ, दिगंबर महाराज समाधीस्थळ आदी स्थानांचे दर्शन घेतले. संस्थानचे विश्वस्त आशिष उमाळकर, डॉ.अभय कोठारी, श्रीरंग सावजी, विठ्ठल खंदारकर, राजेश राऊत, अमित सावजी, विनोदभाऊ बुगदाणे यांनी त्यांचे पूजन केले.

याप्रसंगी बोलताना नामदास महाराज यांनी, संत बाळाभाऊ महाराजांनी गेल्या शतकात धर्मक्षेत्रात क्रांतिकारी कार्य केलेलं असल्याने त्यांचं नाव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आज त्यांच्या संस्थानमध्ये येण्याचा योग येऊन त्यांचे उत्तराधिकारी रंगनाथ महाराज पितळे यांची भेट झाली याचा विशेष आनंद आहे, अशी भावना व्यक्त केली. यावेळी बोलताना ॲड.पितळे महाराज यांनी, पंजाबपर्यंत जाऊन शिखांच्या गुरुग्रंथसाहिबमध्ये ज्यांच्या अभंगांचा समावेश आहे; त्या संत नामदेवांचे थेट वंशज आज आपल्या संस्थानमध्ये आल्यामुळे पावित्र्य वृद्धिंगत झालं आहे, असं मत व्यक्त केलं.

विठ्ठल खंदारकर यांनी प्रास्ताविकातून संस्थानच्या उपक्रमांची माहिती दिली. तर डॉ.अभय कोठारी यांनी आभार मानले. यावेळी चेतन पवार, भगवान कठोरे, पांडुरंग घारे, विजय इंगोले, ज्ञानेश्वर गोरे, गोपाल पितळे, डॉ.श्रीहरी पितळे आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!