मेहकर (उध्दव फंगाळ)
पेनटाकळी प्रकल्पाच्या काठावर गेल्या बारा दिवसांपासून गावठाण हद्दवाढ करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले ग्रामस्थांचे उपोषण गावठाण हद्दवाढ प्रकरणाचा निवाडा मान्य झाल्याने मागे घेण्यात आले. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मा. आमदार संजय रायमुलकर ,आ.खरात यांच्या हस्ते आज समोपचाराने उपोषण सोडविण्यात यश आले.
१९९८ सालापासून पेनटाकळी गावकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित होता. त्यासाठी खा. प्रतापराव जाधव ,तत्कालीन आमदार संजय रायमुलकर यांनी शासन दरबारी सातत्याने प्रयत्न केले. सिंचन प्रकल्पाच्या खालच्या बाजूच्या गावाचे पुनर्वसन नियमानुसार होऊ शकत नाही. त्यामुळे गावठाण हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. हद्दवाढ मगणीसाठी ता .सहा पासून पेनटाकळी येथील गावकऱ्यांनी बेमुदत उपोषण आरंभले होते.
जिल्हाधिकारी यांचेकडे केंद्रीय आयुष, आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या सूचनेनुसार संजय रायमुलकर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. सिद्धार्थ खरात यांनी स्वतंत्र बैठक घेतली. त्यात सात हेक्टर ८२ आर जागेवर ३८२ भूखंड निर्माण करून त्या आराखड्याप्रमाणे गावकऱ्यांना भुखंड वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज उपोषणाच्या बाराव्या दिवशी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आ. खरात ,संजय रायमुलकर यांच्या उपस्थितीत उपोषण स्थळी गावाकऱ्यांशी लोकप्रतिनिधींनी संवाद साधला. प्रतापराव जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, भूमी अभिलेख खात्याने संबंधित जागेचे सीमांकन करावे. शासकीय अभियंत्यांची मदत घेऊन आराखडा तयार करण्यात यावा. सदर जागेवर असलेले अतिक्रमण ग्रामपंचायत ने काढावे, त्यासाठी पोलीस निरीक्षक साखरखेर्डा यांनी योग्य तो बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा. ग्रामसभा घेऊन सर्वांच्या सहमतीने सदर भूखंडाचे वाटप ग्रामपंचायतने करावे. यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर म्हणाले की पेनटाकळी गावचा पुनर्वसनाचा प्रश्न सुटावा यासाठी आम्ही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 27 वर्षापासून अहोरात्र प्रयत्न करत आहोत अनेक अडचणींना सामोरे जावे लागले मात्र तरीसुद्धा गावकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत राहिलो अखेर शिंदे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून या लढ्याला अखेर यश आले असे रायमुलकर म्हणाले
पेनटाकळी येथील ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी करण्यात आलेल्या २७ वर्षाच्या संघर्षाची माहिती मंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजय रायमुलकर यांनी दिली. मागील लोकप्रतिनिधींनी केलेला संघर्ष लक्षणीय आहे. आता गावठाण वाढीसाठी शासकीय अधिकाऱ्यांनी सहकार्य केले आणि ह्या प्रदीर्घ लढ्याला पूर्णविराम मिळाला. ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांनी ते काढून घ्यावे .समाज निहाय वस्ती झाली तर शासकीय योजनांचा लाभही देता येईल, असे यावेळी सिद्धार्थ खरात म्हणाले.
लोकप्रतिनिधींच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन गावकऱ्यांनी उपोषण आज दुपारी दोन वाजता मागे घेतले. यावेळी उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, गट विकास अधिकारी संदीप मेटांगळे,ठाणेदार गजानन करेवाड, भूमी अभिलेखचे गवई, पाटबंधारे चे नागरे, नगर रचना विभागाचे सतीश वेरूळकर, ग्रामसेवक गजानन मवाळ आदी अधिकारी उपस्थित होते.सरपंच परमेश्वर वानखेडे, उपसरपंच पुंजाजी इंगळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर ,दिलीपराव देशमुख, सरपंच संघटनेचे अध्यक्ष अरुण दळवी ,युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव ,नीरज रायमुलकर, तालुकाप्रमुख भूषण घोडे , पंजाबराव इंगळे, विलासराव मोहरुत,प्रल्हादराव सुलताने,राजू काटे,अमोल म्हस्के आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
*********************
